आकाशीचे घन केव्हाचे
दाटून आले दारी
येता आठव सहवासाचा
वळते मन माघारी
खटयाळ वारा झिम्मड धारा
अशाच सायंवेळी
कशी अचानक भेट जाहली
भिजल्या वृक्षाखाली
शहारले तन सुखावले मन
अबोल झाल्या वेली
लगटून गेला वारा आणिक
क्षितीज वाकले खाली
भिजल्या वस्त्रातून प्रगटले
स्पर्शसुखाचे लेणे
दोन जीवांचे होता मीलन
सुटले सर्व उखाणे
संध्यासमयी कधी आठवे
गतकाळाची धून
आकाशीचे घन येतील का
दारी दूत बनून
No comments:
Post a Comment