बाया निसतात गहू
मन अल्लाद उसवे
दु:ख पाखडले जाई
जुने नव्या गव्हासवे!
बाया निसतात गहू
कुणी गुणगुणे काही
ओल्या शब्दामधून
माहेराची सय येई!
बाया निसतात गहू
बाळ दुडदुड येई
मूठमूठ फसाफसा
गहू फिस्कारून देई!
गहू निसता टिपता
चेष्टामस्करीला उत
नवीनवेली जांभई
सांगे जागवली रात!
असे बाजरी गव्हाचे
शतजन्मीचेच नाते
सुखदु:ख पोटातले
ओठातून मुक्त होते!
No comments:
Post a Comment