Pages

Monday, March 26, 2012

अलगुज........कालिंदीच्या किनाय़्राचे

जलवंतीच्या नितळ दर्पणी
स्वप्न रेशमी निरखीत बसते
गडद निळ्या आकाशपटावर
हळवे चिंतन कोरित असते

इंद्रधनूची रंगसंगती
मोहविते मम अवघे मानस
नक्षत्रांच्या दिपशिखांतून
येते उजळून जीवन लोभस

विरळ धुक्याच्या पटाआडचे
बिंब रविचे घेता निरखून
अंधाराचे रहस्य नुरते
नटतो भवती सृजनाचा क्षण

पश्चिम क्षितीजाच्या गालांवर
सहज रेखिता शुक्रचांदणी
अधरांमधूनी गीत उमटते
हळूच मिटते नेत्र पापणी

अलगद अलगुज वाजवणारा
तृणपुष्पांच्या अवती भवती
स्फुरते कविता शब्द लयीतून
दिगंत व्यापून उरतो अंती

- सोनाली

No comments:

Post a Comment