Pages

Tuesday, March 27, 2012

नको येरझार जीवा......


आता राखायचे मौन इतुके
की शब्दांनाही नवल व्हावे ॥

आता राखायाचे अंतर इतुके
की भावनांचे निर्झर व्हावे ॥

आता आकळले रहस्य जीवा
की तुझ्यापायी लीन व्हावे ॥

आता आनंदाचा कंद दिसावा
की मीपण विरून जावे ॥

आता नको येरझार जगाचा
की आत्मरंगी रंगून जावे ॥

आता मागायचे तुज प्रियवरा
की हृदयी  लीन व्हावे ॥

होवो साक्षात्कार आदितत्वाचा


आता पुरे शांतरूपा, त्राही माम भगवंता ।मज आत्मशक्ती देई, धाव रे विश्वरूपा॥१||
गराडा पडला जनांचा, नको गुंता विचारांचा | लुप्त ज्योती मुक्ताई, आकाशी प्रकाश शतसूर्यांचा॥२॥
नाकळे जीवाला हा ,घोर कुठला लागला । अंतरंगी उमटे कल्लोळ,  मार्ग प्रकाशाचा कोठला ॥३॥
आत्मजा तुझ्या चरणी, मागते हेच आता । मज लाभो शक्ती ,  होवो साक्षात्कार आदितत्वाचा ॥४॥

Monday, March 26, 2012

'शब्द' दयाघन...................

या ओठांची महिरप सुंदर
'शब्द' दयाघन अवतरती
सरस्वतीचे वीणा-वादन
श्रवणभक्तीला ये भरती

बाळ बोलता म्हणते - 'आई'!
अद्वैताचा सगुण ठसा......
चराचराला व्यापून उरते
'शब्द-ब्रह्म' हे दाही दिशा

ज्ञानेश्वरीच्या........ओवीमधून.....
गीतार्थाच्या उमलती कमळे
रंग-रुप-रस-गंध आगळे
शब्दप्रती 'शब्दार्थ' वेगळे

प्रारब्धाच्या अतीत नविन
जीव बापुडा वणवण फिरतो
वात्सल्याने पुसुन आसवे
'शब्दच' माया-ममता देतो!

शब्द-स्वरांचे अतुट बंधन
जणू सहाणेवर गंधीत चंदन
काव्य-सुमन हे फुलुन आले
'सरस्वती' प्रती अर्पण केले........!

तुझ्याशिवाय जगणं.............

तुझ्याशिवाय जगणं

शक्य असू शकत

अस वाटू लागलेल असतानाच

धो धो पा‌ऊस आला

बेधुंद कोसळत

झाडांना घुसळत

काचांवरून घरंगळत

रस्त्यांवरून उसळत

मातीला घुसमटवत

गढूळ पाण्याचे लोट

अनावर आवेगाने वहात राहिले

परत

जखमांचे वैशाख

श्रावण बनून पालवले..............

-सोनाली

कागदाची होडी


कुठुनही लिहावं
अशी वही मला दिलीस
आतून दार उघडेल
अशी खोली मला दिलीस
माझ्या काचेच्या तावादानातून
दिसणाय्रा सूर्याला
सूर्य म्हणू दिलस
आणि माझ्या अडगळीच्या खोलीत
कधीही नाही डोकावलस........
हं......
आता माझ्यासारखं
कागदाच्या होडीत बसून
तरंगता येत नाही तुला
तरीही त्या होडीवर छत्री धरून
पावसातून धावतोस
हे ही कळतेच ना मला!!

माझीया अंगणी ........

माझीया अंगणी
आले आभाळ ओथंबूनी

कसा वेल मोगय्राचा
चमके दिसे पाचूवाणी
थेंबथेंब झेलताना
होती थेंबांची की गाणी

आला आषाढाचा मेघ
घाली मल्हाराची आळवणी
धो धो बरसातीची साद
तळे झाले की अंगणी

उमटे मोतीयाची माळ
कोणा सावळ्याची करणी
तळि तरंगाचा हा खेळ
धरा आकाश भेटणी

- सोनाली

येणार त्या क्षणांचे तकदीर वक्त आहे................

येणार त्या क्षणांचे तकदीर वक्त आहे
आहेत त्या क्षणांना आयुष्य फ़क्त आहे

स्पर्शात हिरे पाचु, मोतीच चुंबनात
अनुभुतीचे सुवर्णी धन, येथ गुप्त आहे

मज आजवर शिकायत त्यांच्या खिलाफ़ होती
ही आज खंत, त्यांच्या विना मी मुक्त आहे

शोधित राजरस्ता ती शापभ्रष्ट मंजिल
वरदान काजव्यांचे घाटात लुप्त आहे

आशा उभारणीच्या विसरुन आण-भाका
आपल्याच पडझडीच्या चिंतेत व्यस्त आहे

विमनस्क बाज होता भरोशातल्या नशेला
इल्जाम भोगुनी हा इतिहास नष्ट आहे

कुठल्याच मस्तकी ना सरताज शाश्वतीचा
बेघर सलामतीचे बेताज तख्त आहे.

-सोनाली

तुझे विश्वच वेगळे!

कसे सांगू सखे तुज
माझ्या मनातले भाव
नाही सामर्थ्य शब्दांना
त्यात प्राणाचा अभाव

माझ्या अंतरीचे भाव
त्यांना सागराची खोली
मुग्ध लाजरे अबोल
जणु उत्फुल्ल अबोली

कशी कळावी गे तुला
माझी जळणारी कथा
सदा बोचणारे शल्य
मनी खुपणारी व्यथा

स्वप्न स्वप्निल मनाचे
गेले कधीच विरुन
आणि प्रतिक्षा तुझी गे
दिले करणे सोडून

कसे सांगू सखी तुज
गुज माझ्या मनातले
कशी कळावी वेदना
तुझे विश्वच वेगळे!

- सोनाली

मी मात्र काहीच नाही

मी मात्र काहीच नाही
ते जग तिचे
ते सर्वस्व ही तिचेच
मी मात्र काहीच नाही

ते स्वप्न तिचे
ते पुर्णत्व ही तिचेच
मी मात्र काहीच नाही

ते मैत्र तिचे
ते जीवन हि तिचेच
मी मात्र काहीच नाही

ते सुख तिचे
ते दु:ख ही तिचेच
मी मात्र काहीच नाही

ते अनादिरूप तिचे
तो अंतर्नाद ही तिचाच
मी मात्र काहीच नाही

तो उत्फ़ुल्ल गुलाब तिचा
ति नाजुक सायली हि तिचीच
मी मात्र काहीच नाही

हे माझे जीवन, अन्तर्नाद माझे
सारे तिचे च ना !
मग सांगा , मी तिचीच ना ?


- सोनाली

रंग...........

रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा..
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा...

--सुरेश भट

हे कुठेतरी मनात घोळत होत आणि सुचत गेल तस लिहित गेले...............


सप्तरंगातील माझा कोणताही रंग आहे
जे दिसे त्याहून न्यारे आणखीही अंग आहे..........

वृक्ष झालो की पुराणी वल्लेही नेसणे
उघडा पाषाण होणे अन कशाला लाजणे
सभ्यतेने वागण्याचा और माझा ढंग आहे.............

एवढासा थेंब मी, पण ओघ होऊनी वाहतो
शब्द होऊनी मी अभंगच ऒळ गाऊ लागतो
मी अनेकांतून माझा एकट्याशी दंग आहे.............

रात्रीच्या गर्भात माझा वंश सूर्याचा हवा
फक्त गो-या पौर्णिमेची का करू मी वाहवा
आवस काळी असून, तिजशी नित्य माझा संग आहे..........

-सोनाली

ठेवा..................

नाही जमले मला
मनोरे शब्दांचे रचणे
दिलेला शब्द पाळण्यातच
धन्य मानले जिणे

हिशेब नाही जमलामला
जे गमावले त्याचा
मिळवले जे , तोच
संचय आहे लाखमोलाचा

नसेल जमले मला फुंकर घालणे
दुसय़्राच्या दु:खावर
पण मीठ नाही ओतायचे कधी
एवढा बांध आहे शब्दांवर

नाही मानली खंत कधी
ठेच लागून पडल्याची
सावरून उभी रहायला
होती दुवा सर्वांची

मोल करून त्यांचे
फोल नाही ठरवायचे
जगजाहीर करून
कुबेराला नाही लाजवायचे

माझेच पारडे होईल जड
हिशेब मांडता प्रेमाचा
देवाला का कधी लाभे ठेवा
भरभरून आशिर्वादाचा

पुन्हा एकदा

जीवन जगूया नव्याने एकदा
बेधुंद होऊया पुन्हा एकदा
स्मृतींना देऊया रे उजाळा
मुक्त श्वास घेऊया पुन्हा एकदा

सोनपंख लावूनी उडूया एकदा
रम्य चांदण्यात रमूया एकदा
सुगंध रातराणीचा लुटाया
मग्न होऊन जाऊया पुन्हा एकदा

पावसात चिंब भिजूया एकदा
मोतीया थेंबांनी सजूया एकदा
स्पर्श जादूमयी अन शहारा
मुग्ध होऊन जाऊ पुन्हा एकदा

- सोनाली

प्रवाह!

काळजाच्या गाभाय्राचे
आभाळही ढगाळले
अर्धमिटल्या पापण्यात
अश्रूमेघ तराळले ॥१॥

मुका जीव घरट्यात
जशी गाय हंबरते
मुकी नसतेच माया
व्यथा गळ्याशी दाटते ॥२॥

गुंता जरी हा तरी
जाये तुटूनीया बंध
हिरव्या गं पानासाठी
ठेवे कस्तुरी सुगंध ॥३॥

दिस मंतरून जातो
रात्रीस हेलकावे
स्वप्न आठवाचे
देते तुझ्याच नावे ॥४॥

घटकाभर बैस येथे......

घटकाभर बैस येथे.........
बस माझ्या शेजारी
खुणावतायत बघ तुला मला
लाटा निळ्या चंदेरी

समुद्राच्या लाटात लाटांच्या फेसात
चल डोळे मिटून नाचू
रेतीतल्या शिंपल्यात
शिंपल्यातल्या मोत्यात

आठव ईथले वेचून घेऊ
उर भरून घेऊ श्वास
तुझ्या सवे मी माझ्या सवे तू
सुरू प्रपंचाचा प्रवास

गुणगुणून बघू दे मलाही
गाणी तुझ्या ऒठातली
दिसू दे स्वप्ने मला
गही-या तुझ्या डोळ्यातली

घटकाभर बैस येथे
हातात देऊन हात
डोळे मिटून लपून बसू
तू माझ्या आणि मी तुझ्या आत......

-सोनाली

जाणीव...........

धुंदीत मदन मस्तीच्या
आपलेपण विसरले आहे
त्या समर्पित त्यागाची
जाणीव कुणाला आहे?

बलिदान जयांनी दिधले
पारतंत्र्यातून मुक्त केले
त्या शूर जवानांची
जाणीव कुणाला आहे?

संस्थानिक भाई झाले
सौदेबाजी सारखे झाले
अर्धनग्न महात्म्याची
जाणीव कुणाला आहे?

घरादाराची रांगोळी केली
आत्मसमर्पण हसत दिले
दोन फुले वहाण्या त्यांना
जाणीव कुणाला आहे?

- सोनाली

शहाणपणा

प्रत्येकजण चालत असतो
गरज असते धावायची
प्रत्येकजण आशावादी
गरज असते हसण्याची
हवा असतो आनंद
संगत साथ जोडीची
जेव्हा केव्हा होतो गुदमर
गरज असते बोलायची
बोलांनी मन हलके, फुलते
जीवन होते बोलके
काय बोलावे त्यापेक्षा
काय बोलू नये
एवढच शहाणपण
न बोलता कळण्यासाठी
हवा तेवढाच शहाणपणा

कविता...........

सत्याचा मज नित्य संग
असत्य आम्हा वर्ज्य आहे
झुंज देतो नित्य आम्ही
तह आम्हा त्याज्य आहे ॥१॥

प्रयोग आम्हा जमत नाही
त्याहून बरा वियोग आहे
तुटणे आम्हा होय सोपे
तडजोड करणे अमान्य आहे ॥२॥

वन्हीची ती आच लेवूनी
सुवर्णाने ती शुध्द व्हावे
असावी बावनकशी मिजास अशी
तर मुलामा का व्हावे ॥३॥

असे ऒठात गोड वाणी
तरी दुषणे का करावी
वंचना असे मान्य आम्हा
याचना आम्ही का करावी ॥४॥

हृदयी मम सागर वसे
अंतरात येई प्रेम भरती
समर्पण वाटे श्रेष्ठ आम्हा
मर्यादा मग जमत नाही ॥५॥

- सोनाली

आषाढ्मेघ....

साचू देत तुझ्या डोळ्यात आषाढ्मेघ
माझ्या पिसाय्रावर विश्वास ठेव.........

सगळेच पिसारे बाहेर फुलत नसतात
जंगलातल्या वणव्यांनाही
विझायला बहाणे हवे असतात.

जमिनीत लाव्हेच नसतात,
वाहते झरे देखील असतात .

समुद्र होऊन साठण्याचे
ज्यांचे मुळीच स्वभाव नसतात.

तरीही विश्वास असतो मातीला
त्यांच्या अनावर स्पंदनांचा..........

त्या अबोल नात्याची शपथ
माझ्या तहानेची जाण ठेव

साचू देत तुझ्या डोळ्यात आषाढ्मेघ
माझ्या पिसाय्रावर विश्वास ठेव......

सरस्वती

मनभावन ग ती
चाल साजरी
गंध उधळीत चाले
अष्ट्गंधा गोजिरी

तृप्त मन दर्शनाने
जणू ती चंद्रप्रभा
शब्द जणू मोतीमाळ
सूर्य-तारे देती आभा

केश-कुंतल सावळे
मेघ नभी दाटलेले
भाळी लाल गंध
भाव नयनी साठलेले

शुभ्रवस्त्रा परिधारीणी
देई तुज आशिर्वचन
मयूरासनी बसूनी येई
कर शब्दांमृताचे पान

स्वप्नांची ओंजळ..........

हाती सोपवले तयाने
लाडके स्वप्न विश्वासाने
कृतज्ञतेचा लेवून थाट
आम्ही शोधली प्रकाशाची वाट

नयनातूनी भावी स्वप्ने
साकारण्या उद्युक्त मने
जाणिवेची आश्वस्त हाक
आम्ही शोधली प्रकाशाची वाट

वाटेवरी या हरलो पडलो
फिरूनी तरी पुन्हा धडपडलो
चालवी त्या शिखराची साद
आम्ही शोधली प्रकाशाची वाट

मार्ग खडतर खरेच सारे
हाती घट्ट हात धरा रे
ममतेची ही प्रेमळ साथ
आम्ही शोधली प्रकाशाची वाट

- सोनाली

विरहिणी

दारी बरसल्या गर्द घनांच्या ओळी
आत विरहिणी झुरते अवेळी ॥धृ॥

हवा नेसलेली ओलीशी पैठणी
नाचर्‍या जळावर थेंबबावरी गाणी
अंधारमाखली वाट शांत झोपली ॥१॥

त्या मंथर छाया ती वार्‍याची शीळ
ती अनुरागाची ओढ अशी घननीळ
अनिवार तळमळे जीव आसवे ढाळी ॥२॥

त्या ओल्या वाटा रिमझिमता गारवा
प्राणास उसळत्या ध्यास अनामिक नवा
का हृदयातील जखम होतसे ओली ॥३॥

तू थांब पावसा, सांग राजसा कथा
की जीव वाहिला तुला, तुच सांभाळी
अन सांग विरहिणी झुरते अशी अवेळी ॥४॥

ताजमहालातलं मरणं.....

मरण किती सोप वाटतय ना रे?
काढल्या नळ्या, झाल सर्व शांत
अरे, माझी तडफड तो निर्णय घेताना
कासाविस झालेला जीव कोणाला सांगू रे?

आईच्या पदराला घट्ट धरलेला हात
सोडवलास सहजतेने
तुझा खूप राग आला होता
तेव्हा वाटल वाईट्ट बाबा माझा

दिलस गुलाबाच फुल हातात माझ्या
म्हणलास जपून ठेव,
हीच आई तुझी आता
माझा आर्त चेहेरा कळला का रे?

आता तुही गेलास, मला सोडुन
गुलाबाच कोणतं फुल ठेवायच सांग ना?
लोक बसलेत म्हणायला धीर ठेवा
त्यांना आपल तुपल कस रे समजवायच?

सगळ्यांना दिसल्यात नितळ काचा,
ती तावदान, आणि ताजमहालासारखा
शुभ्र संगमरवर
माझं मन, वेदना कोणाला..............
जाऊ दे बाबा तुला तरी कुठे दिसल्या रे?

- सो्नाली

बंद तावदानां बाहेरच जग

सखे!
अग तुच कोंड्लय स्वत:ला काचेच्या तावदानात
बनली आहेस बाहुली शोभेची
त्या नितळ तावदानातून दिसणारी
गोडगोड हसणारी, बोलणारी
काचेचेच केलेत तुझे हातपाय
त्याच तुझ्या जिवलग माणसांनी

का ग विसरतेस तू ती पावसाची पहिली सर?
मातीचा सुगंध आणि
त्या ओलाव्यात पसरलेली बुचाची फुल

सुर्याची थंडीतली कोवळी किरण, धुक्याची लाट
आणि अंगाला झोंबणारा गारगार वारा
विसरलीस ना ग सगळ?

उन्हाळ्यातला तो मोगरा, ती वाळ्याची जुडी
आठवते का ग तुला?
तुझ्या जगातल्या इतका नाही पण
एक प्रसन्न गारवा त्याला ही

सखे!
अग तोड ग तोड ती तावदान,
आहे ग ताकद तुझ्यात..........
हरू नकोस, कोंडू नकोस
स्वत:च अस्तित्व विसरू नकोस
ये ग परत ये आपल्या जगात

- सोनाली

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला..............

दिपावलीच्या दिवशी....
एक पणती रूसली
म्हणाली मी नाही पेटणार
आधी घ्या शपथ
स्त्री भृणहत्या
मी नाही होऊ देणार ॥धृ॥

दिवाळीच्या सणात
नको का बहीण ओवाळायला?
औक्षण भावाचे
नको का करायला?
भाऊ बहिणीचा हा स्नेह
जणू अमृताचा ठेवा
ठेवा हा अमृताचा जपून ठेवूया
एक पणती स्त्रीत्वाची जागृत ठेवू या
दिपावलीच्या दिवशी....॥१॥

वात्सल्याचे मंदिर, घराचा देव्हारा
देव्हाय्रात आई रूपाने ईश्वर प्रकटला
लेकरात असते, आईचे वरदान
जीवनात त्याच्या प्रकाशाचे दार
नसेल आई तर, अंधार दाटतो
असला सूर्या तरी, प्रकाश हरवतो
म्हणूनच एक पणती प्रज्वलीत करा
स्त्रीत्वाचा आदर मनापासून करा
दिपावलीच्या दिवशी....॥२॥

विवाहाचा सोहळा, पवित्र
पतीपत्नीचे नाते,संस्कृतीचे घडणे
दोन्ही घरांच्या अंगणात
रेखाटते ती रांगोळी
रंगही भरते
सासरी अन माहेरी
रंगांचे मोरापंख
स्त्रीत्वाच्या सणाला
स्त्रीत्वाची पणती प्रज्वलीत करूया
महिलादिनाच्या दिवशी....॥३॥

कशी देहभूल पडली !!!!

किमया का कळेना
कशी आज घडली
अंतर्यामी साजण जरी
पडली देहभूल कशी !

हलकेच मित्र आला
घे‌ऊन गंध साजणाचा
बिलगुन वृक्षास भोगीती
लता स्पर्श साजणाचा!

अव्यक्त प्रिया जरी मी
भूलले सगुण रूपाला
हळुवार हृदय माझे
आतुर मिलनाला!

किमया का कळेना
कशी आज घडली
आंतर्यामी साजण जरी

कशी देहभूल पडली !!!!

एक शमीचं झाड हवं....

जिंकता जिंकता हरण्यात पण
काही वेगळीच मजा आहे

रणकंदन आणि रणं कुठल
हे जाणण गरजेच आहे.

कधी लढाव लागत स्वत:शी
किंवा आपल्याच माणसांशी

अशा क्षणांसाठी मग
शमीचं झाड गरजेचं आहे.

श्री स्वामी समर्थ - भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

उगम नव्हता,

ज्याला अंत नाही,

हा त्रॆलोक्याचा स्वामी

नुसताच संत नाही

त्याचे स्मरण कर

देहभान विसरुन,

तो हळुवार येईल मागुन

अन कानात जाईल सांगुन,

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !

काव्य.........

काव्य तुझी रे प्रिया
जप तिला फुलावाणी
नको वापरून फेकू तू
तिला निर्माल्यावाणी

काव्य तुझीच रे लेक
करी सांभाळ तु तिचा
गेली जर का रुसुन
पुन्हा येणे नाही घरा

काव्य मान ती बहिण
रक्षण करी तिचे
कोणी दुखावेल तिस
तुझ्या नशीबी पहाणे

काव्य तू मान सखी
ती प्रिया, तीच भगीनी
काव्य-साम्राज्य सुखाचे
त्याची ती अनभिषिक्त राणी

कळत नाही........ -

कळत नाही........
ही कसली घुसमट
ही कसली उलघाल
कळत नाही जाते कुठे
ही तरी पायवाट!

मागे आता फिरणे नाही
नाही जाता येत पुढे
आयुष्याच्या अनोळख्या वळणावर
अख्खे अस्तित्व उभे!

तस आता माझ्याजवळ
सांगण्यासारखं काय आहे?
तुझ्या-माझ्या भेटीत आता
सवयीचे औपचारिकपण आहे!

हातात हात गुंफत नाहीत
नसतात निवांत भारले क्षण
दोन घटका सोबत सोबत
घालवणे आता नाही जमत!

नाही ही नाखुषी, नाही तक्रार
माहीत झालेय आता आपणाला
भेट आपुली आजकाल झालीय
सवयीचाचं एक अविष्कार!

म्हणून म्हणते...........
निरोप घेतला न घेतला
तसाच समजून घे
भेट झाली ना झाली
तपशील भरून घे.........

= सोनाली

गहू..

बाया निसतात गहू
मन अल्लाद उसवे
दु:ख पाखडले जाई
जुने नव्या गव्हासवे!

बाया निसतात गहू
कुणी गुणगुणे काही
ओल्या शब्दामधून
माहेराची सय येई!

बाया निसतात गहू
बाळ दुडदुड येई
मूठमूठ फसाफसा
गहू फिस्कारून देई!

गहू निसता टिपता
चेष्टामस्करीला उत
नवीनवेली जांभई
सांगे जागवली रात!

असे बाजरी गव्हाचे
शतजन्मीचेच नाते
सुखदु:ख पोटातले
ओठातून मुक्त होते!

ती परत भेटली.......................

ती' हा शब्द्च जादूभरा.....मनात गुदगुल्या करणारा.
अशी 'ती' परत भेटली यार,

अरे कालच ती दिसली बागेत, अर्रे कलेजा खलास झाला....
अंगावर छान गुलाबी ड्रेस, जीव कार्टीन ने क्षणात नेला...
आमची तर कळीच खुलली, वाटल अरे वा! आयतीच ही भेटली
मग केली कॉलर ताठ आणि हातात पण घेतली किटकॅट
बाजुला दिसली गुलाबाची फुल, म्हटलं असुदे कामी येतीलं बर!!!
जवळ गेलो तिच्या आणि म्हटलं तिला हाय!
आवाज ऐकला नसावा परत धीरा ने म्हटले हाय!
तिने पाहिलं वळून, अन् म्हणे 'राजा......
आता काय सांगू माझ्या जीवाची काय झाली मजा?
आम्ही तर गारचं झालो..........
एकदम थंडगारच झालो......
तितक्यात बाजूने आला राजा....
आमची सर्वांना आली इथे मजा....
तुम्ही काय हसताय राव?तुम्हीची जिरेल तेव्हा काय?

बोच...........

आज सकाळी जाग आली तर....
मनात काही टोचतं होतं.....
डोक बधिर आणि सुन्न मन मला माझं जाणवत होतं

मग काय चढवला मुखवटा
केल्या संवेदना बधीर आणि लागले रे कामाला
काय करणार शेवटी आम्ही प्रोफ़ेशनल ना........

दिवसभर आज तशीच वागत राहिले
मनाचं बोचलेपण साहतच राहिले

विचारले प्रश्न मनाला तरी उत्तरचं मिळेना
काय करावे मज काहीच कळेना

विचार केला ही रे कुठली बोच?
माझी कृत्य, नाती, प्रेम की अजून काही..........?????????

मन................

संवाद तुटत चाललाय,मना मनातला.

कल्लोळ होतोय भावनांचा, मना मनातल्या.

कुठे जावे कळत नाही या मनाला.

शेवटी आपल्याच पायात घुटमळते आहे घेत शोध

मनातल्या मनाचा.

मन एक वसन, धारण केलेलं मिरवायचं तरी किती?

फ़ेकुन द्याव वाटल तरी संभाळाव किती?

मन नाजुकसा हार, जणु गुंफ़लेली मोत्याची माळ

तुटली जर ती तर जोडावी कशी?

मनात उरलाय फ़क्त आता खोलवर अंधार,

जाणिव भुयारात असल्याची,

त्यात उजेडाला पणती लावावी तरी कशी?

मला जाणवलेला कर्मयोग

धर्मतेज जेव्हा होई कमी
साकार रुप जन्म घेतसे मी

युगेयुगे धर्मासाठी अवतार घेतले
सज्जनां रक्षिले दुर्जना मारिले

राग, भय, क्रोध टाकून शरणासी यावे
ज्ञान, तप, बलयोगे एकरूप व्हावे

कर्मफलाची इच्छा नको, कर्मही न बाधती
कर्म अकर्म काय जाणतात रे नेणती

गहन रे असे कर्माची गती
सतत कर्म करी तो बुद्धीमान होई

सर्वा कर्माने ज्ञान मिळे
अंती ज्ञान कर्मा जाळे

ज्ञानदिपाने उजळे अग्नी संयमाचा
कर्मे अर्पूनी त्यास कर योगयज्ञ साचा

द्रव्य, ज्ञान, स्वाध्याय, तप, योगमार्ग
जरी भिन्न एक भाव सर्मपण

संयम आणि श्रध्दा परमशांती देती
संशय नष्ट करोनी ज्ञान-साम्य योग आचरती

आशिर्वाद

ही कविता मला वागणूक आणि वैचारिक प्रगल्भतेची शिकवण देते,
म्हणून मी तिला मला मिळालेला आशिर्वाद समजते.

सूर्य होऊनी जगताना तू, अंगार कधी बरसू नको
अंधार मनाचा दूर करण्या, प्रकाशास अडवू नको

आदराने मस्तक झुकावे, येऊ दे अंगी विनम्रता
अभिमानाने छाती फुलण्या, वाढू दे कार्यतत्परता

दुर्बलांचा तोल सावर, आहे तुझी बळकट भुजा
नको मानू जीवनाला, काय मिळाली आहे सजा

नम्रतेने नजर झुकावी, लाचारीची नको दृष्टी
दूरदृष्टी सदैव असता, वाटेल सुंदर सारी सृष्टी

ऒठांमध्ये मधुरतेची, सरगम नित्य छेडीत रहा
हृदयातला गोडवा, तुझ्या वाणीमध्ये आणून पहा

शब्दांना धार बसावी, स्नेह्बंध नित्य जोडित जावे
मने सारी जिंकून घेता, जीवनाचे गाणे गावे

सुखामागे धाव घेता, दु:खाची लागते ठेच
अनुभवाच्या नभात , सुखाचे चांदणे वेच.

हट्ट.........

कितीही चालत गेलं
तरी ही वाट संपतच नाही
वेडगळ झाल्यागत ही पावल चालताहेत
उजेड अंधाराची तमा न बाळगता
गाव........शहर ओलांडत दूर.............कितीतरी दूर

पण वाट संपतच नाही
आता तर पावलं फारच हट्टाला पेटली आहेत.
आणि मला त्यांचा हट्ट मोडता येत नाही
या वाटेचा अंत शोधण्याचा.

- सोना्ली

छान झालं दिसलात सारे

घरकुलाला काल सुनामीने घेरले
वाटले आता सारे काही संपले

दु:खी कष्टी मन झाले पण बुध्दी ना हरली
वृत्ती ही लढा द्यायची निती ना फिरली

थोरांचे आशिर्वाद आठ्वले आणि तुमचे प्रेम
उभारी धरली मनाने धरला शत्रुवर नेम

नविन आपुले घरकुल आत आपणच सजवू
एकजुटीने राहू सारे मायमराठी जगवू

माझे घर

हात पसरून कायमचे
दार खुले असावे,

दिवसभर दमून भागून
घराच्या उबेला यावे.

एक अनोखा ॠणानुबंध
एक आगळे नाते

घराचे घरपण जपता जपता
आयुष्य सार्थक होते

- सोनाली

अलगुज........कालिंदीच्या किनाय़्राचे

जलवंतीच्या नितळ दर्पणी
स्वप्न रेशमी निरखीत बसते
गडद निळ्या आकाशपटावर
हळवे चिंतन कोरित असते

इंद्रधनूची रंगसंगती
मोहविते मम अवघे मानस
नक्षत्रांच्या दिपशिखांतून
येते उजळून जीवन लोभस

विरळ धुक्याच्या पटाआडचे
बिंब रविचे घेता निरखून
अंधाराचे रहस्य नुरते
नटतो भवती सृजनाचा क्षण

पश्चिम क्षितीजाच्या गालांवर
सहज रेखिता शुक्रचांदणी
अधरांमधूनी गीत उमटते
हळूच मिटते नेत्र पापणी

अलगद अलगुज वाजवणारा
तृणपुष्पांच्या अवती भवती
स्फुरते कविता शब्द लयीतून
दिगंत व्यापून उरतो अंती

- सोनाली

सख्या रे...........

सख्या रे!
साद घातली तुला मी
सांग मला ओळखावे
कसे तुला मी

कधी हसतोस अस्स की
वाटत ह्याला मन कळतच नाही

कधी काढतोस समजूत अशी
की वाटत ह्याच्याशिवाय आपलं कोणीच नाही

सख्या! सांग मलातुझ खर रुप कोणतं?
माझ्या मनातलं की लोकांच्या जगातलं?

तुझ्या अव्यक्त रुपात कल्पान्त शोधणारी मी
आणि तु दाखवतोस तुझं अद्वैत रूप

प्रारब्ध कुणा चुकले ?..................

कोण रे मी ?
अरे सांग मला मी नक्की आहे तरी कोण?

असेन का मी भीष्म
शरपंजरावर पडलेला?
तुम्ही स्वकीयांनीच
मला तिथे टाकलेला

का असेन मी अभिमन्यू
चक्रव्युहात अडकलेला?
काका, मामा सगळ्यांनी प्रयत्न करुन
पण बाहेर न पडू शकलेला?

अरे बाबा, की आहे मी
त्या पांडवांच्या निष्पाप मुलांमधला एक?
चुक नसताना एक घावातचं
जीवे मारला गेलेला

का आहे मी अश्वत्थामा
जीवनाचं वरदानचं
शाप ठरलेला
आणि एकटाच उरलेला

का असेन रे मी द्रौपदी
कृष्ण सखा सोबत असुन
पण चिरहरणातून न सुटलेली

असेन का रे मी अर्जुनही कदाचित
पूर्ण पुरुष असूनही अपूर्णत्वाचा शाप भोगलेला
किंवा रणांगणात स्वत:च
स्त्रीत्व दाखवलेला

आत तूच सांग आहे तरी कोण रे?
मी आहे तरी कोण?

निसर्गाची शिकवणी

निसर्ग बरच काही शिकवत असतो आपल्याला
शिकलं पाहिजे आपण ते आत्मसात करायला

गुलाब शिकवतो आपल्याला
काट्यात राहून हसायला
दलदलीतलं कमळ सांगत
संकटात तग धरायला
शेतावर डुलणार सुर्यफुल सांगत
प्रकाशाकडे वाटचाल करायला
शिकलं पाहिजे आपण ते आत्मसात करायला

स्वच्छंदी विहरणारे पक्षी शिकवतात
आकाशात उंच भरारी द्यायला
इवल्याशा मुंग्या शिकवतात
एकजुटीन रहायला
सुंदर फुलपाखर दाखवतात
जीवन रंगीबेरंगि बनवायला
शिकलं पाहिजे आपण ते आत्मसात करायला

खळखळणारा झरा सांगतो
निखळपणे जगायला
सगळ पोटात घेऊन नदी
शिकवते आईपण जपायला
निसर्गाचा प्रत्येक सदस्य सांगतो
आनंदाची उधळणकरायला
शिकलं पाहिजे आपण ते आत्मसात करायला

फी न घेता शिकवून सुध्दा
देतो आपण त्रास निसर्गाला
त्यामुळेच वर्षातले काही दिवस
जमत नसावं त्याला अश्रू आवरायला
शेवटी ’अति तिथे माती’ प्रमाणे
कारणीभूत ठरतो निसर्गाच्या कोपाला
शिकलं पाहिजे आपण ते आत्मसात करायला

निसर्ग बरच काही शिकवत असतो आपल्याला
शिकलं पाहिजे आपण ते आत्मसात करायला

- सोनाली

तोरण

जेव्हा काजळल्या भितीनं
अंधारल्या विश्वाचा उर फुटतो

काळोखाच्या गर्भातून
उठते एक ज्वाला

धगधगत्या प्राचीतून
झरू लागतो प्रकाश

फिरू लागतो तेजोगोल
गिळत गिळत अंधारकडा

दुमदुमतात दाही दिशा
कोमल स्वरात पक्ष्यांच्या

गुंजारतो उदयगान
भुंगा कानी कळीच्या.........

हास सखे, डोल सखे, नाच सखे
आली वेळ स्वागताची...........

नव्या हर्षाची, बहर लेवून फुलायची
प्रकाशाच्या रेखांनी, बांधलय तोरण आभाळात!!

-सोनाली

आदिमाया

भोगूनिया भोग सारे
तरिही अभोगी मी

मोहवूनी मोह सारे
तरिही निर्मोही मी

विरागी जरी तरी
अनुरागी मी

परब्रह्मास्तव जन्मणारी
आदिमाया ही मी

निलरंगी श्यामवर्णी
अंतरात तव राह्ते मी

सुख, दु:ख सारे
तुझ्यासवे रे साहते मी...

श्रावण भादवा

श्रावण भादवा धरा आली फुलारून
धरा आली फुलारून साज हिरवा लेवून

बरसती धारा धारा चुकून माकून
चुकून माकून मेघ गेले विस्कटून

भारावली केळ देह सुगंधात न्हाला
सुगंधात न्हाला रावा मनात हसला

ऊन पावसाचा खेळ अस्मानी रंगला
अस्मानी रंगला झाला आनंद मातीला

वारा धरी फेर वनी नाचे धुंद मोर
नाचे धुंद मोर निळ्या पिसांचा शृंगार

प्राजक्त फुलांचा सडा अंगणी पडला
अंगणी पडला झुला झुलत राहिला

श्रावण भादवा आला मनी बहरून
मनी बहरून नव्या आशा पालवून

श्रावण भादवा मना देई अलिंगन
देई अलिंगन जसा स्वप्नात साजण

- सोनाली

श्रेयस्कर

ऐहीक सुखाची

लागलेली गोडी

बुद्धिभ्रंश जोडि

क्षणोक्षणी


आसक्तीचा मार्ग

अधोगती साठी

सत्कर्माच्यापाठी

समाधान


श्रेयस्कर वाटे

मानसिक शुद्धी

सदाचार बुद्धी

जागणारी

आकाशीचे घन

आकाशीचे घन केव्हाचे
दाटून आले दारी
येता आठव सहवासाचा
वळते मन माघारी

खटयाळ वारा झिम्मड धारा
अशाच सायंवेळी
कशी अचानक भेट जाहली
भिजल्या वृक्षाखाली

शहारले तन सुखावले मन
अबोल झाल्या वेली
लगटून गेला वारा आणिक
क्षितीज वाकले खाली

भिजल्या वस्त्रातून प्रगटले
स्पर्शसुखाचे लेणे
दोन जीवांचे होता मीलन
सुटले सर्व उखाणे

संध्यासमयी कधी आठवे
गतकाळाची धून
आकाशीचे घन येतील का
दारी दूत बनून

झोका.............

झोका खाली-वर झाला
दिशा डोळ्यातल्या गोल
वाय्रावर उधळले
तिच्या पैंजणाचे बोल

ऐल-पैल घुसळत
नाद काकणाचा होई
तिच्या वयाचा सौरभ
लाज उसवत जाई

भुई सुटता सुटता
पदरही उतावीळ
आणि पाखराइतुके
नभ आलेले जवळ

तिने तशात निळाई
हळू घेतली खुडून
तिच्या पदराने गेली
कैक पाखरे उडून

- सोनाली

स्मृती - सौख्य

वाटे सदाच माझ्या,
जवळीच तू असावे
आजीव जिवनी या,
पळही न अंतरावे

वाटेवरी तुझ्या या,
डोळे सख्या जखडावे
घडणार जे नशिबी,
घडूनी तेच जावे

रे लाडक्या विहंगा,
जाऊ नकोस दूर
विरही तुझ्या वियोगे,
जाईल फुटून उर

दे विस्मृती दैवा,
जगाने पुढे जगावे
हे द:ख जाणवाया,
स्मृती सौख्य ते उरावे

- सोनाली

शब्द.........

आता जना नाही,
आता मीरा ही नाही
शब्दाला अंगारणारा,
आता वाराही नाही

आता जिव्हाळा नाही,
आता उमाळा नाही
शब्दांना कुशीत घेणारा,
आता किनाराही नाही

शब्द.........अनाथासारखे फिरून
परत परत जातात
प्रत्येक घराच्या सावलीला
आता शब्दांनासुध्दा
तुकारामासारखा सहारा नाही

= सोनाली

एक क्षण .........

एक क्षण जादूभरा प्रत्येकाला हवाहवासा,
ध्यानीमनी नसताना समोर उभा अचानकसा

एक क्षण भाळण्याचा, नजरांचे रोख चुकवत
पापण्यांच्या चंद्राआडून नजरभेटीच्या खेळाचा

एक क्षण मंतरलेला बेहोश धुंद भारण्याचा,
आजूबाजूचं अस्तित्व विसरायला लावण्याचा,

एक क्षण बेदरकार, सगळ्यांशी विरोधाचा
जगाशी लढ्ण्याच्या, घेतलेल्या शपथांचा

एक क्षण वेडेपणाचा, मनाच्या गुलामीचा
व्यवहाराशी समजून, उमजून अशी फारकत घेण्याचा

एक क्षण आगदी शहाणा मोहापासून सावरण्याचा,
बेबंद उधळणाय्रा मनाला घट्ट लगाम घालण्याचा

- सोनाली

क्षण निरोपाचा येता......

क्षण निरोपाचा येता
अश्रू दाटती नयनी
आठव या घराचा
भाव ओथंबले मनी

लाभले आशिष थोरांचे
कुठे ठेवू तो सौख्य-ठेवा
मागणे एक त्यांना
कधी विसर न व्हावा

सखे, मैत्र ग माझे
सदा सर्वदा सांगाती
क्षण सुखाचा, दु:खाचा
पाठी उभे माझ्यासाठी

सान पावलांनी काही
उतरती रे मनात
बंधू भगिनींचे प्रेम
सदा राहील अंतरात

मागणे एक तुम्हा
नका देऊ हो अंतर
राहूदे सदा असाच
मायेचा पाझर

-sonali

याद........

अशी रात्र झाली, तुझी याद आली
तुझी याद आली तुझी याद आली

अशी रातराणी, असे चांदणे हे
मना धुंद आली, तुझी याद आली

इथे ऐकतो मी, तुझी श्वासमाला
हवा दूत झाली, तुझी याद आली

विना त्या सुरांच्या, सुने शब्द माझे
सखे बांध चाली, तुझी याद आली

अशा शांत वेळी, मी कुठे स्वत:चा?
मी तुझ्या हवाली, तुझी याद आली

- सोनाली

माहेरी जा पण.............

किती समजावून सांगू
पटत का तुला नाही
जायचेच आहे तर
जा माहेरी एकदाची ॥१॥

मात्र जाताना संगती
घे‌ऊन जा आठवणी
त्यांची सावलीही मागे
नको दे‌ऊस पडूनी ॥२॥

जा‌ईजु‌ईचा तो कुंज
घे‌ऊन जा बरोबरी
ज्यांच्या खाली बसूनीया
प्रेमगीते आळवली ॥३॥

दारातली रंगावली
ठेवू नकोस गं मागे
ज्यात् आपल्या प्रितीचे
गहिरे रंग भरले ॥४॥

बागेतला पारिजात
जाऊ नकोस सोडूनी
माझ्या अश्रूंसवे तोही
फुले टपटपा गाळी ॥५॥

शाल पांघरून जा ग
मुलायम रेशमाची
तुझ्याविण तिच्यात मी
जाईन ना गारठूनी ॥६॥

एवढे ओझे ग राणी
कसे तुला पेलवेल
त्याहून नकोच न ग
माहेराला तू जाऊस! ॥७॥

-सोनाली

केवडा

पावसानंतरची ती सायंकाळ
न्हालेली ओली सृष्टी
हिरव्या सृष्टीवर सांडणारे
ओसंडणारे नारिंगी रंग
या समुद्रातून तू आकारलीस
सुहस्यवदना, अबोल सौंदर्य्वती
नारिंगी रंगात अबोलपणे
दंग झालेली....................

नारिंगी कांतीची जणू
नितळ सतेज ज्योती
तुझ्या सोनचाफ्याच्या अंगकांतीला
उठाव देणारं नारिंगी वस्त्र आठव
ते वस्त्र तुझ्या केवड्याशी
कसं एकजीव होऊन जात होत
नी तू केवड्याचं धुंद झाड होऊन
वावरत होतीस
माझ्या मनात विहरत होतीस................

-सोनाली

देव-लेणी

वेड्या पिस्या मनाची
संत करिती झाडणी
संगे ज्ञानोबा माऊली
ज्ञानभक्ती देवलेणी ॥१॥

माणसास माणसांनी
भुलविले मायपुरी
उधळूनी माणुसकी
धुंडीतो देव राऊळी ॥२॥

नि:शब्द मन मंदिरी
माणसा माणसातली
प्रेम शिळा निखळली
तिथे देव अधांतरी ॥३॥

प्रेम स्वरूप देवाची
प्रेम स्वरूप नगरी
प्रेमाच्याच विटेवरती
भक्त वेड्याची पथारी॥४॥

भूल भूलैय्या बाजारी
का धुंडिता वेड्यापरी
निर्मळ हृदयमंदिरी
उभा गे मुरारी ॥५॥

- सोनाली