ही कविता मला वागणूक आणि वैचारिक प्रगल्भतेची शिकवण देते,
म्हणून मी तिला मला मिळालेला आशिर्वाद समजते.
सूर्य होऊनी जगताना तू, अंगार कधी बरसू नको
अंधार मनाचा दूर करण्या, प्रकाशास अडवू नको
आदराने मस्तक झुकावे, येऊ दे अंगी विनम्रता
अभिमानाने छाती फुलण्या, वाढू दे कार्यतत्परता
दुर्बलांचा तोल सावर, आहे तुझी बळकट भुजा
नको मानू जीवनाला, काय मिळाली आहे सजा
नम्रतेने नजर झुकावी, लाचारीची नको दृष्टी
दूरदृष्टी सदैव असता, वाटेल सुंदर सारी सृष्टी
ऒठांमध्ये मधुरतेची, सरगम नित्य छेडीत रहा
हृदयातला गोडवा, तुझ्या वाणीमध्ये आणून पहा
शब्दांना धार बसावी, स्नेह्बंध नित्य जोडित जावे
मने सारी जिंकून घेता, जीवनाचे गाणे गावे
सुखामागे धाव घेता, दु:खाची लागते ठेच
अनुभवाच्या नभात , सुखाचे चांदणे वेच.