Pages

Saturday, April 12, 2014

देव-लेणी

वेड्या पिस्या मनाची
संत करिती झाडणी
संगे ज्ञानोबा माऊली
ज्ञानभक्ती देवलेणी ॥१॥

माणसास माणसांनी
भुलविले मायपुरी
उधळूनी माणुसकी
धुंडीतो देव राऊळी ॥२॥

नि:शब्द मन मंदिरी
माणसा माणसातली
प्रेम शिळा निखळली
तिथे देव अधांतरी ॥३॥

प्रेम स्वरूप देवाची
प्रेम स्वरूप नगरी
प्रेमाच्याच विटेवरती
भक्त वेड्याची पथारी॥४॥

भूल भूलैय्या बाजारी
का धुंडिता वेड्यापरी
निर्मळ हृदयमंदिरी
उभा गे मुरारी ॥५॥

- सोनाली

Tuesday, March 27, 2012

नको येरझार जीवा......


आता राखायचे मौन इतुके
की शब्दांनाही नवल व्हावे ॥

आता राखायाचे अंतर इतुके
की भावनांचे निर्झर व्हावे ॥

आता आकळले रहस्य जीवा
की तुझ्यापायी लीन व्हावे ॥

आता आनंदाचा कंद दिसावा
की मीपण विरून जावे ॥

आता नको येरझार जगाचा
की आत्मरंगी रंगून जावे ॥

आता मागायचे तुज प्रियवरा
की हृदयी  लीन व्हावे ॥

होवो साक्षात्कार आदितत्वाचा


आता पुरे शांतरूपा, त्राही माम भगवंता ।मज आत्मशक्ती देई, धाव रे विश्वरूपा॥१||
गराडा पडला जनांचा, नको गुंता विचारांचा | लुप्त ज्योती मुक्ताई, आकाशी प्रकाश शतसूर्यांचा॥२॥
नाकळे जीवाला हा ,घोर कुठला लागला । अंतरंगी उमटे कल्लोळ,  मार्ग प्रकाशाचा कोठला ॥३॥
आत्मजा तुझ्या चरणी, मागते हेच आता । मज लाभो शक्ती ,  होवो साक्षात्कार आदितत्वाचा ॥४॥

Monday, March 26, 2012

'शब्द' दयाघन...................

या ओठांची महिरप सुंदर
'शब्द' दयाघन अवतरती
सरस्वतीचे वीणा-वादन
श्रवणभक्तीला ये भरती

बाळ बोलता म्हणते - 'आई'!
अद्वैताचा सगुण ठसा......
चराचराला व्यापून उरते
'शब्द-ब्रह्म' हे दाही दिशा

ज्ञानेश्वरीच्या........ओवीमधून.....
गीतार्थाच्या उमलती कमळे
रंग-रुप-रस-गंध आगळे
शब्दप्रती 'शब्दार्थ' वेगळे

प्रारब्धाच्या अतीत नविन
जीव बापुडा वणवण फिरतो
वात्सल्याने पुसुन आसवे
'शब्दच' माया-ममता देतो!

शब्द-स्वरांचे अतुट बंधन
जणू सहाणेवर गंधीत चंदन
काव्य-सुमन हे फुलुन आले
'सरस्वती' प्रती अर्पण केले........!

तुझ्याशिवाय जगणं.............

तुझ्याशिवाय जगणं

शक्य असू शकत

अस वाटू लागलेल असतानाच

धो धो पा‌ऊस आला

बेधुंद कोसळत

झाडांना घुसळत

काचांवरून घरंगळत

रस्त्यांवरून उसळत

मातीला घुसमटवत

गढूळ पाण्याचे लोट

अनावर आवेगाने वहात राहिले

परत

जखमांचे वैशाख

श्रावण बनून पालवले..............

-सोनाली

कागदाची होडी


कुठुनही लिहावं
अशी वही मला दिलीस
आतून दार उघडेल
अशी खोली मला दिलीस
माझ्या काचेच्या तावादानातून
दिसणाय्रा सूर्याला
सूर्य म्हणू दिलस
आणि माझ्या अडगळीच्या खोलीत
कधीही नाही डोकावलस........
हं......
आता माझ्यासारखं
कागदाच्या होडीत बसून
तरंगता येत नाही तुला
तरीही त्या होडीवर छत्री धरून
पावसातून धावतोस
हे ही कळतेच ना मला!!

माझीया अंगणी ........

माझीया अंगणी
आले आभाळ ओथंबूनी

कसा वेल मोगय्राचा
चमके दिसे पाचूवाणी
थेंबथेंब झेलताना
होती थेंबांची की गाणी

आला आषाढाचा मेघ
घाली मल्हाराची आळवणी
धो धो बरसातीची साद
तळे झाले की अंगणी

उमटे मोतीयाची माळ
कोणा सावळ्याची करणी
तळि तरंगाचा हा खेळ
धरा आकाश भेटणी

- सोनाली

येणार त्या क्षणांचे तकदीर वक्त आहे................

येणार त्या क्षणांचे तकदीर वक्त आहे
आहेत त्या क्षणांना आयुष्य फ़क्त आहे

स्पर्शात हिरे पाचु, मोतीच चुंबनात
अनुभुतीचे सुवर्णी धन, येथ गुप्त आहे

मज आजवर शिकायत त्यांच्या खिलाफ़ होती
ही आज खंत, त्यांच्या विना मी मुक्त आहे

शोधित राजरस्ता ती शापभ्रष्ट मंजिल
वरदान काजव्यांचे घाटात लुप्त आहे

आशा उभारणीच्या विसरुन आण-भाका
आपल्याच पडझडीच्या चिंतेत व्यस्त आहे

विमनस्क बाज होता भरोशातल्या नशेला
इल्जाम भोगुनी हा इतिहास नष्ट आहे

कुठल्याच मस्तकी ना सरताज शाश्वतीचा
बेघर सलामतीचे बेताज तख्त आहे.

-सोनाली

तुझे विश्वच वेगळे!

कसे सांगू सखे तुज
माझ्या मनातले भाव
नाही सामर्थ्य शब्दांना
त्यात प्राणाचा अभाव

माझ्या अंतरीचे भाव
त्यांना सागराची खोली
मुग्ध लाजरे अबोल
जणु उत्फुल्ल अबोली

कशी कळावी गे तुला
माझी जळणारी कथा
सदा बोचणारे शल्य
मनी खुपणारी व्यथा

स्वप्न स्वप्निल मनाचे
गेले कधीच विरुन
आणि प्रतिक्षा तुझी गे
दिले करणे सोडून

कसे सांगू सखी तुज
गुज माझ्या मनातले
कशी कळावी वेदना
तुझे विश्वच वेगळे!

- सोनाली

मी मात्र काहीच नाही

मी मात्र काहीच नाही
ते जग तिचे
ते सर्वस्व ही तिचेच
मी मात्र काहीच नाही

ते स्वप्न तिचे
ते पुर्णत्व ही तिचेच
मी मात्र काहीच नाही

ते मैत्र तिचे
ते जीवन हि तिचेच
मी मात्र काहीच नाही

ते सुख तिचे
ते दु:ख ही तिचेच
मी मात्र काहीच नाही

ते अनादिरूप तिचे
तो अंतर्नाद ही तिचाच
मी मात्र काहीच नाही

तो उत्फ़ुल्ल गुलाब तिचा
ति नाजुक सायली हि तिचीच
मी मात्र काहीच नाही

हे माझे जीवन, अन्तर्नाद माझे
सारे तिचे च ना !
मग सांगा , मी तिचीच ना ?


- सोनाली