Pages

Thursday, October 6, 2011

अन क्षण मोत्यासम चमकला................!!!!!!!!!!

मनात घुमणारं निराशेच वादळ,
पावलांचा उमटणारा पुरा असहकार
गिळंकृत करायला मिट्ट काळॊख
शांततेत लोपलेले कानातील गोंगाट

समोर उभे प्रश्न वावटळीसारखे
कदाचित नेतील उसवून मला
वाट दिसतीय दूरवर नेणारी
पण तिही अंधाराने माखलेली

हातात एक मिणमिणती पणती
पण जीव कितीसा उरलाय?
माझ्याकडे तिला द्यायला नाही
ना तेल........ना वात!!

सगळ्या अस्तित्वावऱ चढणारी काजळी
जाणवतोय काळा मिटट अंधार
बोटातून सरतय आज आयुष्य
कणाकणाने........क्षणाक्षणाने!!

असं वाटतानाच आलय कोणी
हाक देत क्षितीजाच्या पलिकडून
हातात घेऊन सळसळणार चैतन्य
माझ अस्तित्व भारून टाकणार !!

माझ्यात सामावलय आता सारं
सर्व आसमंतही भारून टाकणार
डोळ्यांच्या कडा झाल्या सोनेरी
अन हृदयात सामावलाय परमानंद !!

त्या तेजाने झळाळलय अस्तित्व
समोरची वाटही लख्ख उजळलीय
अन सामोरा येणारा क्षण-न-क्षण
या प्रकाशात मोत्यासम चमकला !!